कोल्हापूर: प्रतिनिधी
पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या १७ वर्षांपासून आपल्या लेखणीने आणि कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार शुभांगी तावरे यांना कृती फाउंडेशनच्या वतीने यावर्षीचा मानाचा ‘आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लवकरच एका विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
शुभांगी तावरे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पत्रकारितेतील आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या विविध क्षेत्रांत निर्भीडपणे काम केले आहे. कौटुंबिक वारसा म्हणून मिळालेल्या ‘दैनिक क्रांतीसिंह’मधून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. महिला पत्रकारांना सहसा सांस्कृतिक किंवा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या बीटवर काम दिले जाते, असा एक समज समाजात आहे. मात्र, तावरे यांनी हा समज मोडीत काढत क्राईम (गुन्हेगारी), राजकारण, महानगरपालिका, विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, वैद्यकीय आणि सामाजिक अशा सर्वच आघाड्यांवर आपल्या लेखणीचा प्रभाव पाडला आहे.
बदलत्या काळाची पावले ओळखून त्यांनी ‘Kolhapur 24 News’ या ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ‘क्षणार्धात बातमी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. आज या वेब मीडियाचे हजारो वाचक असून, कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातील बातम्या पोहोचवण्यात हे पोर्टल अग्रेसर आहे.
जोखमीच्या क्षेत्रात काम करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल आणि महिला पत्रकारांसमोर एक आदर्श निर्माण केल्याबद्दल, कृती फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
धडाडीच्या पत्रकार शुभांगी तावरे यांना ‘आदर्श जिजाऊ प्रेरणा पुरस्कार’ जाहीर
